आळंदीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण   

आळंदी (वार्ताहर): येथील द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या वतीने तीन दिवसीय दिव्यांग - दृष्टीहीन बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात उत्साहात आयोजित करण्यात आले.
 
या पारायणात महाराष्ट्रातून ५२ दिव्यांग अंध भाविकांनी सहभाग घेत पारायण सोहळा हरिनाम गजरात उत्साहात पार पडला. प्राकृत भाषेची गोडी लागावी व पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण ( पठण )  व्हावे या उद्देशाने या पारायणाचे आयोजन सलग तिसर्‍या वर्षी आळंदी देवस्थानचे भक्तनिवासात आयोजित करण्यात आले होते. या तीन दिवसात अध्याय क्रमांक ९, १२, १५, १६ व १८ असे ५ अध्यायाचे पारायण उत्साही आनंदी वातावरणात झाले. सायंकाळच्या सत्रात कीर्तनसेवा झाली. पारायणाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रपती पारितोषिक विजेते गणपत महाराज जगताप हे दृष्टीहीन असून त्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे.  त्यांनीच या पारायणाचे नेतृत्व केले. या पारायणाच्या सांगता दिनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, नानजीभाई ठक्कर ठाणावाला,  मनोहर दिवाणे, विष्णू महाराज केंद्रे, माऊली वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक उपस्थित होते. दृष्टीहीन बांधवांना आजही ज्ञानेश्वरी चे पूर्ण ग्रंथ ब्रेल लिपीत उपलब्ध नाही. अवघे १८ अध्याय असून ते सर्व ब्रेल लिपीत उपलब्ध व्हावेत अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भविष्यात १० व १३ वा अध्याय आणखी जोडल्यास दृष्टीहीन बांधवांना ते ज्ञानवर्धक होईल असे अरुण महाराज म्हणाले.  भविष्यात अंध व्यक्तीं करता संपूर्ण ज्ञानेश्वरी ब्रेल लिपीत करण्याचा मानस असल्याच्या भावना अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी आळंदीच्या विश्वस्तांसमोर व्यक्त केली.  संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींनी कार्यक्रमाचे यशस्वीतेस विशेष परिश्रम घेतले. 

Related Articles